भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

Murud accident
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील मुरुड-अलिबाग मार्गावर बारशिव येथे दिनांक १३ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने अक्षय किसनलाल जयस्वाल (२७) व लालचंद्र रामप्रसाद गौड (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. रेवदंडा पोलिसांनी आरोपी संदीप प्रभाकर म्हात्रे (४९) याला अटक केली आहे.
बारशिव गावच्या हद्दीत श्री साई गेस्ट हाऊसजवळ अपघात घडला. मृत तरुण रेवदंडा येथून मुरुडकडे परतत असताना भरधाव कारने राँग साइडने येत मोटारसायकलला समोरून धडक दिली. अपघातानंतर दोघांनाही तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर आरोपी चालक संदीप म्हात्रे घटनास्थळावरून न थांबता रोहाकडे पळून गेला. रेवदंडा पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून त्याला रोहा तपासणी नाक्यावर अटक केली. या घटनेबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पो.उ.नि. दीपक म्हशीलकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *