बोर्लीपंचतन येथे अतिसाराच्या रुग्णांची संख्या ३०८ वर पोहोचली असून, गुरुवारी घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकही नवीन रुग्ण आढळून न आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. संभाव्य साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अतिसाराचा नेमका स्रोत अद्याप स्पष्ट झाला नसल्याने पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
संभाव्य दूषित पाण्याचा धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने गावातील पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता केली असून, पाण्याचे दररोज क्लोरीनेशन केले जात आहे. तसेच नागरिकांना पाणी निर्जंतुक करण्यासाठी मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. गावातील विविध पाणीस्रोतांचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी अलिबाग येथील जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. ५) आरोग्य पथकाच्या घरोघरी सर्वेक्षणात नवीन रुग्ण आढळला नसला, तरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागात एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दैनंदिन सर्वेक्षण सुरूच ठेवले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असले, तरी पाण्याच्या तपासणी अहवालानंतर अतिसाराचा दूषित पाण्याशी संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून थंड केल्यानंतरच वापरावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि जुलाब, अतिसार किंवा पोटदुखीची लक्षणे दिसताच तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.