TPK. इंग्लिश मीडियम व आर. पी. खारपाटील ज्युनिअर कॉलेज व हायस्कूलच्या प्राचार्या सुप्रिया म्हात्रे यांनी शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. एम.एस्सी. (रसायनशास्त्र) शिक्षणादरम्यान त्यांच्या सहा संशोधन निबंधांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या IJARSCT नियतकालिकात निवड होऊन प्रकाशन झाले आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये वीर वाजेकर ए.एस.सी. महाविद्यालय, फुंडे (उरण) येथे एम.एस्सी. (रसायनशास्त्र) शिक्षण घेत असताना प्राचार्या सुप्रिया म्हात्रे यांनी संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. इंटरनॅशनल जर्नल ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च इन सायन्स, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी (IJARSCT) या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांच्या सहा संशोधन निबंधांचे प्रकाशन झाले.
या संशोधनामध्ये हरित रसायनशास्त्र, शाश्वत संश्लेषण, सेंद्रिय रसायनशास्त्र, विद्युत-रसायनशास्त्र तसेच आधुनिक रासायनिक तंत्रज्ञान या विषयांवरील सखोल अभ्यास मांडण्यात आला असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, वैज्ञानिक नवकल्पना आणि शाश्वत विकासाबाबतची त्यांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. याचबरोबर, सन २०२५ मध्ये वीर वाजेकर महाविद्यालयाशी संलग्न संशोधकांचे अनेक रसायनशास्त्र विषयक समीक्षात्मक संशोधन निबंधही IJARSCT मध्ये प्रकाशित झाले आहेत.
प्राचार्या म्हणून प्रशासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असतानाच उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सातत्याने कार्य करून सुप्रिया म्हात्रे यांनी “आजीवन शिक्षण” आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची ही कामगिरी शिक्षक, विद्यार्थी आणि नवोदित संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरत असून शिक्षण, संशोधन आणि नवसर्जन यांचा समतोल साधण्याचा उत्तम संदेश देते. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, सहकारी, शिक्षणप्रेमी आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करत भावी संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक नेतृत्वासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.