पोलादपूर येथील ‘आपला दवाखाना’ येथे डेरवणच्या वालावलकर रुग्णालयातर्फे मोफत तपासणी शिबिर

पोलादपूर | शैलेश पालकर 
शहरातील आपला दवाखाना येथे डेरवणच्या श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे भ.क.ल.वालावलकर रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात येणार असल्याचे यावेळी रूग्णालयाचे पोलादपूर येथील सहकारी समाजसेवक उदय मधुसूदन खरे यांनी सांगितले.
जन आरोग्य समिती सदस्य समाजसेवक माजी उपसरपंच मंगेश नगरकर यांच्या हस्ते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे करण्यात आले. शिबिरामध्ये नागरिकांना अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञ अशा विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांसाठी एकाच ठिकाणी मोफत तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा मिळाली.
आपला दवाखाना चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे व त्यांची कन्या डॉ. दिव्या सोनावणे, अमित वैद्य, पंकज बुटाला, शैलेश बुटाला, प्रशांत पवार, नगरसेविका श्रावणी शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ 100 रुग्णांनी घेतला. यावेळी विविध शासकीय आरोग्य योजनांमधून मोफत तसेच अल्प खर्चात करावयाच्या शस्त्रक्रियांसाठी पोलादपूर येथे डेरवण रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर तपासणी झालेल्या रुग्णांना पाठविण्यात येणार आहे.  मोबाईल मेडिकल टीम च्या वैद्यकीय अधिकारी डॉ दिव्या सोनवणे कर्मचारी श्रीमती प्रियंका कापडेकर, सनी दुदुस्कर, रुपेश भोसले आणि आशा उत्तेकर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.