एखाद्या खेळाडूच्या यशामागे त्याची मेहनत, जिद्द आणि चिकाटी असतेच; मात्र त्याला योग्य दिशा देणारे शिक्षक, प्रोत्साहन देणारी शाळा आणि भक्कम क्रीडा संस्कार यांचाही मोठा वाटा असतो. पोयनाड येथील को. ए. सो. ना. ना. पाटील हायस्कूलने हीच परंपरा जपत रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यालयातील’ श्रीराज सिकंदर केळकर’ याची १४ वर्षांखालील शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याने शाळेच्या क्रीडा परंपरेचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.
श्रीराजच्या या यशामागे त्याची मेहनत आणि शाळेतील क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम पिंगळे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळा समितीचे सभापती पंडितशेठ पाटील यांच्या प्रोत्साहनातूनही विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला बळ मिळत आहे. या शाळेने आजवर रायगड जिल्ह्याला अनेक नामवंत खेळाडू दिले असून, येथील क्रीडा संस्कारांतून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपली यशस्वी कारकीर्द घडवत आहेत. त्यामुळे श्रीराजची महाराष्ट्र संघातील निवड ही केवळ एका खेळाडूची कामगिरी नसून, शाळेच्या समृद्ध क्रीडा वारशाचा गौरव आहे.
काही शाळा केवळ विद्यार्थी घडवत नाहीत, तर जिल्ह्याचा क्रीडा इतिहास घडवतात! पोयनाडच्या ना. ना. पाटील हायस्कूलची ही क्रीडा परंपरा अशीच उज्ज्वल राहो आणि पुरुषोत्तम पिंगळे यांच्यासारख्या मार्गदर्शकांच्या हातून महाराष्ट्रासह देशासाठी नवे खेळाडू घडोत, हीच अपेक्षा.दरम्यान, श्रीराजवर सर्वच स्थरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.