पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला! ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेचा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील ‘आमची माती आमची माणसं’ सामाजिक संघटनेने संस्थापक राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली 15 एप्रिल 2026 रोजी दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलसमोरील आंदोलनानंतर आजतागायत नगरपंचायत पोलादपूरच्या प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने कोणतेही पाऊल न उचलल्याने गुरूवार, दि. 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता कचराप्रवण क्षेत्राबद्दल पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदालनाला पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचानेही पाठिंबा दर्शवित पोलादपूरकर नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
 पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासिनता दाखविल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमीलगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राऊंड तयार झाले असून त्यामुळे मोकाट गायी-गुरे यांच्या पोटात प्लास्टीकचा कचरा जाऊन पोटं मोठी झाली आहेत तर पावसाळयात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदुषित पाणीपुरवठा नळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात ठोस पाऊले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सपशेल दूर्लक्ष केले आहे.
याविरोधात, दि.15 एप्रिल रोजी संस्थापक राज पार्टे यांच्या ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेने छ.शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंड वर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले. यावेळी काही नगरसेवक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी या आंदोलनामध्ये टोकाची भूमिका नको, असे सांगून छ.शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंड वर उभारण्यास परावृत्त केले. मात्र, यानंतर राज पार्टे यांनी कचरा गाडी घेऊन नगरपंचायतीच्या प्रांगणात ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेच्या सभासदांसह जाऊन कचराप्रश्नी सत्ताधारी उपनगराध्यक्ष व प्रशासनाचे लक्ष वेधले. यानंतर दोन आठवडे उलटूनदेखील नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारचे गांभिर्याने पाऊल उचलले नाही.
यामुळे पोलादपूरकरांच्या भावना तीव्र झाल्या असून नगरपंचायतीकडून कचराप्रश्नी होणाऱ्या दूर्लक्षामुळे गाईगुरे, पाळीव प्राणी यांच्यासह नदीपात्रालगत भाजीफळे, बकऱ्याकोंबडयांचे अवशेष आदी जैवकचरा आणि प्लास्टीक पिशव्यांसह धातू आणि सांडपाणीसदृश्य ओला कचरा मोठया प्रमाणात टाकला जात असल्याचे सातत्यही कायम राहिले आहे.
पोलादपूर नगरपंचायतीने वर्षाला 79 लाख रूपयांची निविदा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याकामी ठेकेदाराला दिल्यानंतरही सफाई कामगारांची संख्या कमी असतानाही जास्त संख्या दाखवून रोजमजूरीवर डल्ला मारणे तसेच कचऱ्यातील प्लास्टीकच्या वस्तू तसेच तांबे, पितळ, स्टील आदी धातूंच्या वस्तूंना चरई फाटयाजवळील भंगारविक्रेत्याकडे कचरा गाडी उभी करून रितसर वजनकाटयावर पिशव्या ठेऊन वजन करून कचऱ्यातून भंगारविक्रीचाही प्रकल्प राबविण्यात आला असल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनावर कचरा ठेकेदार आणि कचराप्रवण क्षेत्रासंदर्भात कोणतेही नियंत्रण नसल्याचे उघड झाल्याने आजच्या आंदोलनाप्रसंगी पोलादपूरकर जनतेसह ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेकडून जाब विचारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.