पैठण-कोतवाल रस्ता ठरतोय आदर्श; दर्जेदार कामामुळे पोलादपूर तालुक्यात चर्चा

पैठण-कोतवाल रस्ता ठरतोय आदर्श
पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील रस्त्यांचा दर्जा आणि सद्यस्थिती गेल्या काही वर्षांपासून खालावली असताना नव्याने होऊ घातलेले काही रस्ते आदर्शवत होत आहेत तरीही अन्य रस्त्यांचे ठेकेदार त्यापासून प्रेरणा घेत नसल्याने होऊ घातलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या रस्त्यांची दूरवस्था अटळ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील पैठण ते कोतवाल बुद्रुकच्या केंद्रीय राखीव निधीतील रस्ता आदर्शवत् झाला असून याच रस्त्याच्या कोतवाल बुद्रुक गावाला जोडणाऱ्या पुलाचा दर्जादेखील पायापासून स्लॅबपर्यंत सर्वोत्तम राखण्याचा प्रयत्न या कामाची देखभालदुरूस्तीच्या जबाबदारीच्या कालावधीपेक्षा अधिक मजबुतीकरणाचा असल्याचा दिसून येत आहे.
पैठण कोतवाल दाभाड रस्त्याचे रूंदीकरण व सुधारणा करण्याच्या कामाचे सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे जमीर धामणकर यांनी ठेकेदार होऊन आव्हान स्विकारले. यापूर्वी 2005 च्या भूस्खलनानंतर तत्कालीन आ.माणिकराव जगताप यांनी या रस्त्याच्या सक्षमीकरणाच्या कामासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतर अनेकदा याच रस्त्यावरील मोऱ्या साकव वाहून गेल्यानंतर स्थानिक ठेकेदारांनी केलेल्या कथित प्रयत्नांना ‘आपलंच पोर’ म्हणून स्थानिक नागरिकांनी नाराजीनंतरही खपवून घेतले होते. या रस्त्याची दूरवस्था पोलादपूर ते पैठण व पुढे कोतवाल अशी दिसून येत असताना संपूर्ण रस्त्याचे काम कधी होईल, यासाठी सर्वच गावात प्रतिक्षा असताना तालुक्यातील कुडपण खुर्द ते महाबळेश्वरपर्यंतचा पर्यायी रस्त्याचे काम नेटाने करून सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे जमीर धामणकर यांनी ठेकेदार म्हणून केलेले प्रयत्न मंत्री ना.गोगावले यांच्याकडून वाखाणले जात असताना मंत्री दर्जाचे विधानपरिषद सदस्य आ.प्रवीण दरेकर यांनी देखील जमीर धामणकर यांच्यावर विश्वास दर्शविल्याने हे काम अधिकच दर्जेदार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय राखीव निधीतून तब्बल 6 कोटी रूपयांच्या प्रशासकीय मान्यतेच्या या कामाला सुरूवात झाल्यापासून आजतागायत दर्जा व गुणवत्तेच्या चर्चा तालुक्यात सर्वत्र होऊ लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पूर्वीच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी डोंगर उभा कापून 7 मोऱ्यांचे बांधकाम नव्याने करून रूंदीकरण साध्य करताना संपूर्ण रस्त्याचे खडीकरणाने सोलिंग करण्यापासून डांबरी कार्पेट होईपर्यंत 5 कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या या कामाची प्रगती स्थानिक जनतेच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी होती. पहिल्यांदा 3 मीटर रूंदीचा रस्ता होता आता तो 5.5 मीटर रूंदीचा आहे. पूर्वी साईडपट्टीसह 5 मीटर असलेल्या या रस्त्याच्या नव्याने झालेल्या रूंदीकरणानंतर 10 मीटर रूंदी दिसून येत आहे. यासाठी पूर्वीच्या डेप्युटी इंजिनियरमार्फत करण्यात आलेल्या एस्टीमेटशनमध्ये रूंदीकरणाचा विषय समाविष्ट करून अधीक्षक अभियंत्यांमार्फत मंजूरी मिळवून काम करण्याची आवश्यकता भासल्याने ठेकेदार जमीर धामणकर यांनी तशी पूर्तताही केली आहे.
रस्ता नव्याने साकारला जात असताना प्रत्यक्ष कोतवाल बुद्रुक गावाला जोडणाऱ्या पुलाचे कामही करण्याची आवश्यकता स्पष्ट झाली होती. त्यामुळे जुना पूल बेसमेंटपासून पूर्णपणे उखडून त्याजागी चार पिलर्स उभारून नव्याने 30 मीटर लांबी आणि 8.5 मीटर रूंदीचा पूल उभारताना पुलाचे दोन्ही बाजूचे ऍप्रोचरोड शिल्लक ठेऊन काम सुरू करण्यात आले. पावसाळयापूर्वी स्लॅब टाकून पुलाचे काम पुर्णत्वास जाणार असल्याने या कामात सिमेंट तसेच स्टील आणि खडी, वाळूचाही दर्जा सर्वोत्तम ठेऊन गती आणली गेली आहे.
पूर्वी फरशीवर तेल सांडले तरी बोटाने पुसून घ्यावे असे टाईल्सचे कौतुक केले जात असे त्याचधर्तीवर डांबरी कार्पेट झाल्यानंतर केंद्रीय राखीव निधीचा रस्त्याचा दर्जा अधोरेखित झाला आहे.