पेण पोलिसांची मोठी कारवाई : महिलेचा विनयभंग व बदनामी प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
रायगड जिल्ह्यातील पेण पोलिसांनी महिलेचा विनयभंग, सोशल मीडियावरून बदनामी आणि अश्लील संदेश प्रसारित केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला थेट उत्तर प्रदेशातून अटक करत मोठी कारवाई केली आहे. जवळपास दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत अखेर त्याला गौतमबुद्धनगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले.
पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ७५(१), ७९, ३२६ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६७ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना २६ मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ दरम्यान मौजे हिमगौरी हॉटेल, ता. पेण येथे घडली होती. या प्रकरणी २८ मार्च रोजी अधिकृत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत अरुण पलीये (वय ४०, रा. डॉ. पलीये यांच्या घराजवळ, कवारापेठ, ता. उमरेड, जि. नागपूर) याने फिर्यादी महिला, तिचे पती प्रविण शिगटे आणि हॉटेल मालक गजेंद्र पाटील यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअॅप स्टेटस आणि मोबाईल मेसेजद्वारे अश्लील, अपमानास्पद व लज्जास्पद मजकूर प्रसारित केला होता. आरोपीने इंग्रजी आणि हिंदी भाषेत महिलेबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकून तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच फेसबुकवरही बदनामीकारक पोस्ट टाकून संबंधितांना मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. आरोपीला वारंवार नोटीस बजावूनही तो तपासात सहकार्य करत नव्हता. उलट स्वतःचे ठिकाण लपवत पोलिसांना चकवा देत होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी नागपूर, सातारा तसेच इतर राज्यांमध्ये पथके रवाना केली होती.
तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील बिसरक पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीचा ठावठिकाणा लागला. पेण पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली. मात्र आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीनंतर १४ मे २०२६ रोजी रात्री ११.३९ वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला सुरजपूर, गौतमबुद्धनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने १५ मे ते १८ मे दरम्यान ट्रान्झिट वॉरंट मंजूर केल्यानंतर आरोपीला पेण येथे आणण्यात आले. पुढे न्यायालयाने आरोपीला १९ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवधारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, राजेश पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.