पेण तालुक्यात अवैद्य दगड खाणीच्या अवजड वाहतूकीमुळे आदिवासींचा प्रवास बनलाय जीवघेणा 

Durshet road
पेण : 
पेण तालुक्यातील चुनाभट्टीपासून दुरशेत, निगडावाडी, दर्गावाडी, प्रधानवाडी, भेंडीची वाडी अशा अनेक आदिवासी वाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता सध्या अवैध दगड खाणीच्या ओव्हरलोडेड डंपरमुळे स्थानिक नागरिकांसाठी जीव घेणा ठरत आहे. 
पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक बेकायदेशीर दगड खाणी व खडी क्रशरचे प्लान्ट आहेत. मुंबई गोवामहामार्ग ते दर्शित गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसाला जवळजवळ 300 ते 400 ओव्हरलोडेड अवैद्य अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांमुळे प्रचंड धूळ उडते, ती धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारले जाते त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. पायी चालणाऱ्या लोकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो. शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध, रोजगारासाठी जाणारे तरुण पायी किंवा दुचाकी वाहनाने प्रवास करत असताना अवजड वाहतूकीमुळे या रस्त्यावर या अनेक छोटे-मोठे अपघात होऊन किरकोळ दुखापत व वाहनांचे नुकसान झाले आहे.  
 मागच्या १० दिवसात या वाहनांमुळे तीन मोठे अपघात झाले आहेत दि.१२ मे २०२५ रोजी दुरशेत गावातील रहिवासी पुंडलिक हिराजी गावंड आणि प्रणित तुळशीदास गावंड हे पायी चालत असताना, डंपर चालकाचे नियंत्रण सुटून त्यांच्या अंगावर डंपर येत असताना सतर्कतेमुळे ते पटकन रस्त्याच्या बाजूला झाले म्हणून मोठा अपघात होताना वाचला.  १५ मे रोजी दुरशेत गावचे रहिवासी किशोर बाबुराव डंगर हे नाईट शिफ्ट करून दुचाकीवर घरी परत येत असताना चुनाभट्टी-दुरशेत फाट्यावर त्यांच्या दुचाकीवर वेगाने डंपर आला. त्यांनी दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. परंतु दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
स्थानिक ग्रामस्थांनी पेण पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. मात्र अजून ठोस कारवाई झाली नाही. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर तात्काळ उपाययोजना न झाल्या तर मोठं आंदोलन उभारलं जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *