पेण- गडबच्या “अनुज पाटील”ची CA परीक्षेत उल्लेखनीय यश – परिसरात आनंदाचा उत्सव

पेण- गडबच्या "अनुज पाटील"ची CA परीक्षेत उल्लेखनीय यश! परिसरात आनंदाचा उत्सव
उरण | विठ्ठल ममताबादे 
 कु. अनुज अनंत पाटील याने नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुज हे रोमिता अनंत पाटील आणि अनंत कृष्णा पाटील यांचे सुपुत्र असून, पाटील कुटुंबाचे मूळ गाव गडब (ता. पेण, जि. रायगड) आहे. हे दांपत्य उच्चशिक्षित असून, विवाहानंतर पनवेल येथे स्थायिक झाले आहे. शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या प्रगतीसाठी सतत प्रोत्साहन दिले.
अनुज लहानपणापासूनच शांत, नम्र आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. शालेय जीवनात त्याने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली असून, दहावीला ९०% आणि बारावीला ८९% गुण मिळवले. वडिलांची इच्छा होती की तो डॉक्टर व्हावा, परंतु स्वतःच्या आवडीने अनुजने कॉमर्स शाखा निवडून सी.ए. बनण्याचा ध्यास घेतला. कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणींवर मात करत त्याने कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मशिस्त यांच्या जोरावर सी.ए. इंटर आणि फायनल दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अंतिम परीक्षेत त्याने उत्तम गुणांसह यश मिळवले.
या उल्लेखनीय यशानंतर पनवेलमधील हर्षनिती सोसायटीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पाटील कुटुंबाने रहिवाशांना पेढे वाटून मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला. मूळ गाव गडब आणि कोन येथील नातेवाईकांनाही अभिमानाची भावना झाली असून, अनुजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनुज पाटीलचे हे यश केवळ पाटील कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण पेण–पनवेल परिसरासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *