पुनर्वसन फसवणूक व बोगस ग्रामपंचायतप्रश्नी शेवा कोळीवाडा महिला संघटनेचा एल्गार — १५ ऑगस्टपासून जेएनपीए चॅनेल बेमुदत बंद करण्याचा इशारा

पुनर्वसन फसवणूक व बोगस ग्रामपंचायतप्रश्नी शेवा कोळीवाडा महिला संघटनेचा एल्गार
उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )
शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने पुनर्वसनातील फसवणूक, ठकवणूक व बेकायदेशीर ग्रामपंचायत रचना याबाबत ठोस निर्णय न घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी व जेएनपीए प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. याच निषेधार्थ संघटनेने १५ ऑगस्ट २०२५ पासून जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. २६ जून व १८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आदेश दिले असतानाही, ते स्वतः निर्णय घेण्यासाठी पुढे न आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
१९८७ साली घोषित १७ हेक्टर पुनर्वसनाची जमीन आजतागायत मिळालेली नाही आणि त्यातील १५ हेक्टर जमीन वन विभागाला हस्तांतरित केल्याचा मुद्दा संघटनेने मांडला आहे. १९९२ साली स्थापन करण्यात आलेली बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी २०२४ साली घेतलेला असूनही, तो प्रत्यक्षात उतरलेला नाही. उलट बोगस प्रभाग रचना करून नगरपरिषद व ग्रामपंचायतमध्ये दुहेरी मतदान चालू असून स्थानिक नागरिकांचे हक्क डावळले जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
संक्रमण शिबिरात पिण्याच्या पाण्याचा, नागरी सुविधांचा अभाव असून, रोजगार व पुनर्वसनाच्या मुद्द्यावरही प्रशासन उदासीन असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. सरबानंद सोनोवाल यांनी दिलेली पुनर्वसन जमीन देण्याची वेळोवेळी आश्वासने अपूर्ण राहिल्यामुळे विस्थापितांची सहनशीलता संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा भंग झाल्यास त्यास जिल्हाधिकारी व जेएनपीए जबाबदार राहतील, असे स्पष्ट निवेदन प्रसिद्धीपत्रकात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *