पिडीत मुलीस फूस लावून पळवणारा आरोपी अखेर जेरबंद; पनवेल पोलिसांचा तांत्रिक तपास यशस्वी

Panvel aropi
पनवेल (संजय कदम) : 
पनवेल तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पळवून नेणाऱ्या आरोपीस पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने अखेर अटक केली आहे. आरोपी संजय राठोड (वय 22, रा. खैरणेगाव) याने पीडित मुलीसह बाहेरच्या राज्यात पलायन केले होते.
या प्रकरणात पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, पो.हवा. महेश धुमाळ, सतीश तांडेल यांच्यासह पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. आरोपी सतत आपले मोबाईल क्रमांक व वास्तव्यासाठीचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
तथापि, पोलिसांनी हार न मानता कर्नाटकमधील यादगीर, तेलंगणामधील सिकंदराबाद व आंध्रप्रदेशमधील तिरुपती येथे पाठलाग करून अखेरीस सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आरोपीस स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्यासोबत पीडित मुलीसुद्धा सापडली.
पनवेल येथे आणल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पीडितेनेही आरोपीविरुद्ध शारीरिक संबंध असल्याचे सांगितल्याने गुन्ह्यात पॉस्को कायद्यानुसार कलमे वाढवून त्याला अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *