पाले खुर्द येथील स्मशानभुमी मोजते अखेरची घटका

Pale khurd smashanbhumi
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील पाले खुर्द येथील कुंडलिका नदीच्या तिरावर असणारे वैकुंठधाम स्मशानभूमी अखेची घटका मोजत असल्याचे चित्र येथील नागरिकांना पहावयास मिळत आहे.ती लवकरात लवकर नवीन बांधण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

जीवनाच्या रंगमंचावरील शेवट म्हणजे मृत्यू,असे म्हणतात की मृत्यूची वाट ही कठीण असते हे खरे असुन याचा प्रत्यय पाले खुर्द येथील स्मशान भूमीची दूरवस्था पाहता दिसून येत आहे.या बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीवरील शेडचे पत्रेच राहिले नाहीत.सरणाचे चौथाऱ्यांचीही मोडतोड झाल्याने एखाद्या मयताचे सरण रचण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होत आहेत.तसेच त्याच्या आजूबाजूला काटेरी झाडेझुडपे देखील पावसामुळे भयानक वाढली आहेत.यातून जातांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.याबाबत ग्रामस्थानी वारंवार तक्रारी करून ही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

स्मशानशेडवर पत्रे नसल्यामुळे पावसाळ्यात सरणासाठी आणलेली लाकडे ओली राहत आहेत यामुळे मृतदेहाची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही पावसाळ्यात पाण्यापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.तसेच अस्थी गोळा करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.’याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा,ही प्रत्येकाची इच्छा असते.परंतु मेल्यानंतरही याठिकाणी मरणयत्ना भोग्याव्या लागत आहेत.तरी सदरील प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या विकास निधीतून ग्रामपंचायत मार्फत स्मशानशेडचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी येथून ग्रामस्थ नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *