पाली पोलीस ठाण्यात शौचालय दुरुस्तीसाठी ८.४४ लाखांची निविदा; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

रायगड | अमुलकुमार जैन
पाली येथील पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या प्रसाधनगृह (शौचालय) दुरुस्तीसाठी तब्बल ८ लाख ४४ हजार ६७० रुपयांची निविदा काढण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग विभागाकडून ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका अंतर्गत येणाऱ्या पाली पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या प्रशासन गृहातील प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीसाठी ही निविदा काढण्यात आली आहे. सूचनाक्रमांक ३२ सन २०२५–२०२६ (ऑफलाइन निविदा) या नावाने ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून जावक क्रमांक अवि/लेशा/निविदा/११०४/२०२६ या क्रमांकाने दिनांक १० मार्च २०२६ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या निविदेवर अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांच्या स्वाक्षरीने ती अधिकृत करण्यात आली आहे. संबंधित निविदा संकेतस्थळावर प्रसिद्ध असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी सविस्तर माहिती कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयीन नोटीस बोर्डवर उपलब्ध असल्याची टिप देण्यात आली आहे.
मात्र अलिबाग विभागीय कार्यालयात नोटीस बोर्डच नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या निविदेची सविस्तर माहिती नेमकी कुठे प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निविदा प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात आल्याने पारदर्शकतेबाबतही काहींनी शंका उपस्थित केल्या आहेत.
दरम्यान, केंद्र शासन किंवा राज्य सरकारकडून घरकुल योजनेंतर्गत सर्वसामान्य कुटुंबांना साधारणतः जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. त्याच वेळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रशासन गृहातील प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ८ लाख ४४ हजार ६७० रुपयांची निविदा काढण्यात आल्याने नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “घरकुलासाठी दोन लाख मिळतात, तर एका शौचालयाच्या दुरुस्तीसाठी इतका मोठा खर्च कसा?” असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत “आज पोलीस निरीक्षकांच्या प्रशासन गृहासाठी साडेआठ लाखांची निविदा काढली जात आहे, तर उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शौचालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोटी रुपयांची निविदा काढणार का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही निविदा ठेकेदारांच्या फायद्यासाठी आहे की प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊन काढण्यात आली आहे, याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांना ही निविदा पोलीस निरीक्षकांच्या शौचालय दुरुस्तीशी संबंधित असल्याचा समज होत असल्याने या प्रकरणाबाबत अधिक स्पष्टता आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
या संदर्भात अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांच्याशी संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी “तुम्ही मला लेखी पत्र द्या, मी चौकशी करते,” असे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली असल्याने त्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, “पोलीस निरीक्षकांच्या प्रशासन गृहातील प्रसाधनगृहासाठी लागणारे साहित्य परदेशातून आणणार आहेत का?” असा उपरोधिक सवालही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. साधारण शौचालय दुरुस्तीच्या कामासाठी एवढ्या मोठ्या रकमेची निविदा काढण्यामागील नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.