नवी मुंबई पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील रबाळे पोलीस ठाणे हद्दीत पायी जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढून अश्लील कृत्य करणाऱ्या विवेक गजानन कदम (वय ३५, रा. घणसोली, नवी मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:३५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी रस्त्याने पायी जात असताना आरोपी तिच्या मागून आला. त्याने मुलीला पाय मारत तिचे नाव विचारले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर तात्काळ रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (प्रशासन) बनसोडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे आरोपी विवेक कदम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २९३/२०२६ नुसार BNS कलम ७४ तसेच POCSO कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.