खारघरमधील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर सोमवारी एक धोकादायक घटना घडली. वर्षा सहलीसाठी धबधब्याच्या माथ्यावर गेलेल्या मुंबईतील पाच शालेय विद्यार्थी मुसळधार पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे खाली उतरू शकले नाहीत व तिथेच अडकले.
सुदैवाने, वेळेवर मिळालेल्या माहितीनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून सर्व पाच विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे सुटका केली. हे पाचही विद्यार्थी मुंबईतील सायन कोळीवाडा, आंबेडकर चाळ येथील रहिवासी आहेत. या धाडसाने कोणतीही इजा झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
पांडवकडा धबधब्यावर वर्षा सहलीसाठी जाण्यावर बंदी असतानाही विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश केल्यामुळे, खारघर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
पोलिस व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीने पांडवकडा धबधब्याजवळ वर्षा सहलीसाठी जाऊ नये.