परतीच्या पावसानं खालापूर तालुक्यात थैमान; वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, मोठं नुकसान

खालापूर | अर्जुन कदम 
 परतीच्या पावसाने मंगळवारी उशिरा संध्याकाळी चौकसह खालापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, विद्युत पोल आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
उशिरा संध्याकाळी अचानक आलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पावसापूर्वी विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की, अंगावर काटा आणणारे वातावरण निर्माण झाले होते. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल वाकले असून झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. संपूर्ण पावसाळ्यात असा जोरदार पाऊस झाला नसल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
वादळी पावसामुळे अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही विस्कळीत झाल्याने नुकसानीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परिसरातील सुकलेले ओढे आणि नालेही या पावसामुळे प्रभावित झाले आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी सांगितले. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.