पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपीसह चौघांना अटक; 7 गुन्ह्यांची उकल

घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपीसह चौघांना अटक
पनवेल | संजय कदम
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पारगाव शाखेतील सहाय्यक अभियंता अमित पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील 34 ट्रान्सफॉर्मरपैकी 7 ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना पनवेल शहर पोलिसांनी सराईत आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक करून एकूण 7 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. यावेळी पोलीस नाईक सम्राट डाकी यांना यास खबऱ्याकडून सदर आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार अमर मुस्ताक अहमद, शिवम अमरनाथ शर्मा, गणेश मनोज शाहू आणि आलोक अजय गौतम यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाईत पोउपनि दत्तात्रय देवकते, पोहेकॉ योगेश दिवेकर, पोना सम्राट डांकी, पोना अनिल चव्हाण, पोशि दत्ता जाधव, पोशि साईनाथ मोकल, पोशि विशाल दुधे आणि पोशि सचिन कोर यांनी सहभाग घेतला. अटक आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असून, त्यांच्या विरोधात परिसरात आणखी गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत. तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.