पनवेल-रावे मार्गावर राज्य परिवहन (एसटी) बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका ४० वर्षीय महिलेचा गंभीर अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावे फाट्याजवळ भरधाव वेगात वळण घेताना दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या महिलेला बसमधून बाहेर फेकले गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताच्या वेळी महिला तिच्या ३४ वर्षीय मैत्रिणीसह पनवेल ते रावे एसटी बसने प्रवास करत होती. बसचा वेग कमी न करता चालकाने अचानक वळण घेतल्याने दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या महिलेला तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. या अपघातात तिच्या डोक्याच्या मागील भागासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चालक सिद्धेश्वर महाले याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत पुढील तपास करत आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी असलेल्या या मार्गावर चालकांच्या बेफिकीर वाहनचालकामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.