उष्णतेचा कहर! महाड परिसरात तापमान ४५ अंशांवर; आरोग्य, शेती आणि बाजारपेठेवर परिणाम

महाड | मिलिंद माने 
महाड आणि परिसरात आता सूर्य अक्षरशः आग ओकत असून गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. मार्च महिना संपत असताना आणि एप्रिल सुरू होण्यापूर्वीच तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. बुधवारपासून तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले असून सगळीकडे अंगाची लाही लाही होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. मळमळ, उलटी, डोकेदुखी, अपचन यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या बदलत्या हवामानाचा फटका कृषी क्षेत्रालाही बसत आहे. आधीच आंबा पिक धोक्यात आले असताना आता कडधान्य पिकांवरही उन्हाचा परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी घालणे आणि चेहऱ्याभोवती स्कार्फ वापरण्याचे आवाहन केले आहे.