पनवेल महापालिकेत भाजपाचा दबदबा; ८ नगरसेवक बिनविरोध, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Panvel mahanagar palika
पनवेल | विशेष प्रतिनिधी 
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने बिनविरोध उमेदवार विजयी करून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून कल्याण-डोंबिवलीनंतर आता ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर आणि पनवेल महापालिकेतही भाजपचे  उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पनवेल महापालिकेत भाजपचे सात तर अपक्ष एक असे एकूण ८ उमेदवार बिनविरोध आले असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
दरम्यान,  पनवेल महापालिकेतून भाजपचे नितीन पाटील हे पहिले बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून त्यांची निवड झाली असून, येथील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे मतदान होण्यापूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी ठरला.
बीजेपीचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार:
१) नितीन पाटील
२) रुचिता लोंढे
३) अजय बहिरा
४) दर्शना भोईर
५) प्रियंका कांडपिळे
६) ममता प्रितम म्हात्रे
७) स्नेहल ढमाले
पनवेलमध्ये भाजपची सत्ता मजबूत
२०१७ साली पनवेल महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली होती. एकूण ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक भाजपचे, शेकाप – 23, काँग्रेस – 2, राष्ट्रवादी – 2 होते. मात्र यंदा भाजपची शिवसेना शिंदे गटासोबत युती असून मागील निवडणुकीत शिवसेनेला पनवेलमध्ये खातेही उघडता आले नव्हते. मात्र यावेळी युतीमुळे दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणूक जिंकू आणि पुन्हा भाजपचाच महापौर बसेल, असा विश्वास भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण आणि शहरी सिडको भागांचा समावेश असलेल्या पनवेल महापालिकेत पाणीपुरवठा, गटारे आणि सार्वजनिक वाहतूक या समस्या प्रमुख असून त्यावर विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
जागावाटपाचं गणित
महायुती:
एकूण जागा – ७८
भाजप – ७१
शिवसेना (शिंदे गट) – ४
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – २
आरपीआय (आठवले गट) – १
महाविकास आघाडी:
शेकाप – ३३
शिवसेना (ठाकरे गट) – १९
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ७
काँग्रेस – १२
मनसे – २
समाजवादी पार्टी – १
वंचित बहुजन आघाडी – १
इतर – ३
पनवेलचे राजकीय समीकरण
राजकीय विश्लेषकांच्या मते, पनवेलचे राजकारण रामशेठ ठाकूर कुटुंबाभोवती फिरत असून विरोधक कमकुवत झाल्याने भाजपची सत्ता पुन्हा महापालिकेवर येण्याची शक्यता अधिक बळावली आहे. ठाकूर कुटुंब शेकापमध्ये असताना शेकापची सत्ता, काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसची सत्ता आणि भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची सत्ता.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *