अलिबाग तालुक्यात 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

नागोठण्यात 23 वर्षीय पुजाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !
अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील वायशेत (जितनगर) परिसरात मानसिक अस्वस्थतेतून ३३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत्त्तुल्ला वाशीउल्लाह खान (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव असून तो चोंढी, अलिबाग येथे वास्तव्यास होता. मूळचा उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेला हिदायत्त्तुल्ला हा नार्वेकर कंपाऊंडमध्ये सुमारे दहा वर्षांपासून लाकूड पॉलिशचे काम करत होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्यामुळे त्याचा लहान भाऊ हिदायततुल्ला खान याने ३१ डिसेंबर २०२५ रोजी त्याला पनवेल रेल्वे स्थानकावर नेले व पनवेल–गोरखपूर रेल्वेगाडीत बसविले. मात्र तो गावी न जाता अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी गेला.
१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी तो वायशेत येथेच राहणाऱ्या त्याच्या काकांच्या घरी गेला. सायंकाळी काका घरी आल्यानंतर घर बंद असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान तो निर्जीव अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे नातेवाईक व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *