पनवेलमध्ये हाय-टेन्शन वायर तुटल्याने भीषण आग; अनेक दुचाकी, झोपड्या जळून खाक

Panvel zopdpatti fire
पनवेल | 
नवीन पनवेल पूर्वेतील पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात दुपारी अचानक हाय-टेन्शन वीजवाहिनी तुटताच भीषण आग भडकली. काही मिनिटांतच आग झोपडपट्ट्यांमध्ये वेगाने पसरली आणि अनेक दुचाकी व झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात एकच गोंधळ उडाला. धुराचे प्रचंड लोळ आकाशात उठल्याने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी आणि स्थानिक नागरिक घाबरून गेले.
घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस, वाहतूक शाखा, महावितरण आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. गॅस सिलेंडर आणि ज्वलनशील वस्तूंमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता होती; मात्र अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करून आग नियंत्रणात आणली. स्वीट्ससमोरील हाय-टेन्शन टॉवरवरून वायर तुटून थेट झोपड्यांवर आदळल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विशेष म्हणजे, विचुंबे गाढी नदी पूल ते नवीन पनवेल ब्रिजपर्यंत तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वायर लोंबकळत असल्याचेही समोर आले आहे.
या घटनेचा परिणाम वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात झाला. स्टेशन परिसरातील पार्किंगमधील अनेक दुचाकी जळून नुकसानग्रस्त झाल्या. शाळा सुटण्याच्या वेळी घटना घडल्याने पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले. माजी सभापती अॅड. मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि टीआयपीएलचे जगदीश घरत यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली आणि मदतकार्य गतीमान करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *