कथित ‘कॅश व्हिडिओ’ने रायगड जिल्ह्यातील राजकारणात भीषण धुरळा उडवला आहे. साधा व्हिडिओ म्हणून सुरू झालेले प्रकरण आता एजन्सी तपास, आंदोलन, पुतळा दहन, आरोप-प्रत्यारोप अशा टोकदार टप्प्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचे राजकीय समीकरण नव्याने ढवळून निघताना दिसत आहेत.
अलिबागेत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची मालिका सुरूच असताना त्यांनी थेट विधान केले. कॅश व्हिडिओ खरा की खोटा हे गौण; संबंधित आमदारांचे सर्व बँक खात्यांची व आर्थिक व्यवहारांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले, हा व्हिडिओ ही मोठ्या चित्रातील छोटी घटना आहे. या आमदारांवर आधीपासून गुन्ह्यांचे ढीग आहेत. घरगुती हिंसाचारासह अनेक गुन्हे नोंद आहेत. पार्श्वभूमी सर्वांनाच माहीत आहे. पाटील यांनी ‘पन्नास खोके’ प्रकरणासह पूर्वीचे व्हिडिओ, ठेकेदारांकडून कथित कमिशन, तक्रारी यांचा उल्लेख करत वातावरण आणखी तापवले.
शेकाप विरुद्ध शिंदे गट – कॅश व्हिडिओ’ने उघडला नवा राजकीय अध्याय
त्याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अंबादास दानवे यांच्या नोटांच्या गड्ड्यांसह येणाऱ्या व्हिडिओने शिंदे गटात संतप्त प्रतिक्रिया निर्माण केली. रायगडमधील अनेक ठिकाणी दानवे यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आले. माजी प्रतोद मानसी दळवी आणि पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना व्हिडिओची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
दरम्यान, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनीही मंत्री भरत गोगावले यांच्याशी संबंधित रोख रकमेसह असलेला व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर सादर केला आणि त्याची सखोल चौकशी होण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाने राज्यभरातून तीव्र निषेध नोंदवला, तर गुरुवारी सकाळी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीने एकत्रितपणे चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार निषेध नोंदविला.
तपासच ठरवणार रायगडचे भविष्यातील राजकारण
राजकीय विश्लेषकांच्या मते- शेकाप अचानक आक्रमक, शिंदे गट बचावात, आणि ठाकरे गटाने व्हिडिओ साखळीची सुरुवात, यामुळे रायगडमध्ये तीनही गट आमनेसामने उभे राहत आहेत. पुढील काही दिवसांत जिल्ह्यात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे प्रकरण आता फक्त राजकीय न राहता कायदेशीर व तपासकेंद्रित वळणाला लागले आहे. तपास कोणत्या एजन्सीकडे जातो आणि निष्कर्ष काय येतो, यावर रायगडचे राजकीय भवितव्य अवलंबून राहिले आहे.