रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच अलिबाग–चौल परिसरात राजकीय वर्चस्वाचा संघर्ष उफाळून आला. निकालानंतरच्या जल्लोषातूनच दोन गट आमनेसामने येत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. या संघर्षातून शिवीगाळ, दमदाटी, महिलांची छेडछाड, वाहनफोड व मारहाणीचे प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून, रेवदंडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत फिर्यादी राजलक्ष्मी गिरीश खामीतकर (वय ३८, व्यवसाय – गृहीणी, रा. नामाव बिच बंदर, ता. अलिबाग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या मामा सचिन राऊळ यांच्या निवडणूक विजयाच्या आनंदात त्या नातेवाईकांसह फॉर्च्युनर (एमएच ०६ सीएल ६३१८) मधून शीतलादेवी चौल येथे जात असताना तुलाडदेवी मंदिराजवळील शिवसेना (उबाठा) कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी वाहन अडवले. यावेळी शिवीगाळ, दमदाटी करत गाडीवर फटके मारून नुकसान करण्यात आले. गाडीतील अश्विनी सुतार हिचा हात ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आरोपी साहील राऊत याने लोखंडी रॉडने वाहनाची मागील काच फोडल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच अंकित गणेश गुरव व विदयेश नंदकुमार माळी यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आरोपी संस्कार म्हात्रे, सुरेंद्र मारुती भगत, अजित म्हात्रे, साहील राऊत, मारुती भगत, अजित गुरव, अजित मिसाळ, शैलेश घरत, आर्यन मिसाळ, प्रतीक नाईक, अजिंक्य मिसाळ यांच्यासह इतरांविरुद्ध गु.र.नं. १९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे (वय ५८, रा. चौल, तुलाडदेवी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी उबाठा पक्ष कार्यालयात निवडणूक निकालाचा आढावा सुरू असताना विजयी मिरवणुकीत फटाके लावण्यावरून वाद झाला. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कार्यालयाच्या आवारात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत फिर्यादींचा मुलगा संस्कार यास दुखापत झाली असून, आरोपी प्रतीक माळी याने फिर्यादींची पत्नी रुपाली म्हात्रे हिचा हात धरून ओढत स्त्री मनास लज्जा उत्पन्न केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणी अंकित गुरव, अमोल घरत, सिद्धेश शेणवईकर, निखिल राऊत, महेंद्र घरत, अमित राऊत, विदेश माळी व प्रतीक माळी यांच्याविरोधात गु.र.नं. २०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांची दखल घेत अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.