पनवेल महानगरपालिकेत नियुक्ती आदेश रद्द झाल्यानंतरही काही सेवानिवृत्त अधिकारी नियमबाह्य पद्धतीने कामकाज करत असल्याचा गंभीर आरोप प्रहार सामाजिक संघटनेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई व संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी संघटनेने पालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिकेने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार विविध कामांसाठी ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती केली होती. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतरही काही सेवानिवृत्त अधिकारी मालमत्ता व आरोग्य विभागात कोणत्याही वैध कार्यालयीन आदेशाशिवाय काम करत असल्याचा आरोप प्रहार सामाजिक संघटनेने केला आहे. यापूर्वी आयुक्तांनी मार्च महिन्यात २८ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द करून सेवा समाप्तीचे आदेश दिले होते. तरीही संबंधित अधिकारी पालिकेत कार्यरत असल्याचा दावा करत संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिरीषकर यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे, कोणाच्या आदेशावरून ते पालिकेत काम करत आहेत आणि यात आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून तत्काळ निलंबन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.