नागोठणे आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा; जैववैविध्य व समरसतेचा संदेश

Nagothane iti
नागोठणे (महेंद्र माने) :
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवार, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोकण प्रांताचे प्रज्ञा प्रवाह, प्रचार आयाम प्रमुख मंदार परांजपे, रिलायन्स CSRच्या वरदा कुलकर्णी, IMC चेअरमन सुनील कदम, सिद्धार्थ भगत, स्वेता परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने, स्वागत गीत, व पाहुण्यांचे पारंपरिक स्वागत करून झाली. विद्यार्थ्यांनी शिव गीते, माता जिजाऊ यांचे स्मरणगीत, व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून पथनाट्य, तसेच खरजे आणि गौरव चव्हाण यांची शिव गर्जना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन व्हिडीओद्वारे झाले. यानंतर झालेल्या विचारप्रवर्तन सत्रात मंदार परांजपे यांनी पर्यावरण रक्षण, जैववैविध्य संवर्धन आणि समरसतेचा विचार मांडला. “समाजातील सर्व घटकांमध्ये परस्पर प्रेम, सन्मान, भेदभावरहित सहअस्तित्व म्हणजे समरसता,” असे ते म्हणाले.
वरदा कुलकर्णी यांनी कौशल्य विकासावर भर देत “स्वतःमधील कौशल्य ओळखा, आणि एकत्रित प्रयत्नांनी यशाचे शिखर गाठा” असा संदेश दिला. सुनील कदम यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत याचे सातत्य राखण्याचे आवाहन केले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक: कोमल म्हात्रे, भूमीका वारगुडे, पायल तांबोळी,
द्वितीय क्रमांक: यश पाटील, विघ्नेश साळुंखे,
तृतीय क्रमांक: अथर्व पाटील, प्रथमेश म्हात्रे
या विजेत्यांना चषक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना एस.आर. पाटील यांनी केली. प्राचार्य विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आयोजन केले. प्रसाद जोगत यांनी स्टेज, लाईट व स्पीकरची मोफत व्यवस्था करून योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *