नववर्ष स्वागतासाठी मुरुड–अलिबाग परिसरात यंदा अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गसौंदर्यामुळे मुरुड–अलिबाग हा परिसर पर्यटकांचा आवडता ठिकाण ठरला. मात्र, प्रचंड गर्दीमुळे निवासव्यवस्थेचा मोठा ताण निर्माण झाला असून अनेक पर्यटकांना राहण्यासाठी अक्षरशः झगडावे लागले.
मुरुड तालुक्यातील हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट्स तसेच होमस्टे पूर्णतः भरले होते. परिणामी अनेक पर्यटकांना काशिद परिसरात पर्यायी व्यवस्था शोधावी लागली. काही स्थानिक कुटुंबांनी आपल्या घरातील ओटी, हॉल किंवा मोकळी जागा पर्यटकांना रात्री झोपण्यासाठी उपलब्ध करून दिली. मात्र, या साध्या सुविधांसाठीही पर्यटकांकडून अडीच ते तीन हजार रुपये आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोलापूर येथून कुटुंबासह आलेले अर्जुन राठोड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुरुड तालुक्यात कुठेही राहण्याची जागा मिळाली नाही. शेवटी काशिद परिसरात एका घराच्या ओटीवर झोपण्यासाठी आम्हाला तीन हजार रुपये मोजावे लागले. पाणी आणि स्वच्छतागृहाचीही नीट सुविधा नव्हती, तरीही पर्याय नसल्याने पैसे द्यावे लागले.
गेल्या तीन दिवसांत मुरुड–अलिबाग परिसरात नववर्ष स्वागतासाठी पन्नास हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या तसेच स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी असल्याचे चित्र दिसून आले.
पर्यटकांची ही वाढती संख्या स्थानिक व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली असली, तरी काही ठिकाणी अवाजवी दर आकारल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा पर्यटनस्थळी दरनियंत्रण, अधिकृत निवासव्यवस्था आणि पर्यटकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव कडू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.