
उरण (विठ्ठल ममताबादे) :
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील सफाई कामगार व कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकले असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. वित्त विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे व नगरविकास विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँक व विमा कंपन्यांचे हप्ते थकीत होत असल्याने कर्मचाऱ्यांचा सिबिल स्कोरही खराब होत आहे. त्यामुळे शासनाच्या दुर्लक्षाविरोधात ९ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदान ते मंत्रालय या दरम्यान भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चाद्वारे थकीत वेतन तातडीने अदा करणे, प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी वेतन देणे, सफाई कामगार व सर्व कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन करणे, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करणे, सफाई कामगारांना घरे बांधून देणे, स्वच्छता निरीक्षकांची वेतनश्रेणी वाढवणे, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, तसेच कंत्राटी कामगारांना कायम करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मोर्चामध्ये राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी केले आहे.
Related