धक्कादायक ! पनवेल तालुक्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

पनवेल | प्रतिनिधी 
पनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वनविभागाच्या जागेत एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ११ एप्रिल रोजी मुख्य रस्त्यापासून सुमारे १५० ते २०० फूट अंतरावर हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करत पुढील तपास सुरू केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले तसेच गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने पंचनामा करून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासात महिलेचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत आढळल्याने तिची ओळख पटविणे अवघड ठरत असून ती स्थानिक आहे की अन्य ठिकाणाहून आणण्यात आली आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.
दरम्यान, महिलेची हत्या अन्यत्र करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आला की घटनास्थळीच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत. पोलिसांनी बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी सुरू केली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पनवेल तालुका पोलीस सखोल तपास करत आहेत.