तालुक्यातील तरणखोप येथे बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छापेमारी केली. या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जसिमोद्दीन अबुल कासिम काझी (वय 49, मूळ रा. बगुरा, बांगलादेश) आणि लिली खातून खुरशीद अली (वय 43, मूळ रा. नवारोन, बांगलादेश) हे दोघे मोहन सखाराम पाटील यांची चाळ, अमृत बेकरी जवळ, तरणखोप येथे आपली ओळख लपवून बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते.
पेण पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे छापेमारी केली असता, या दोघांचे बांगलादेशी नागरिकत्व स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 101/2025 अन्वये परकीय नागरिक अधिनियम 1946 चे कलम 14, परकीय नागरिक आदेश 1948 चा नियम 3(1) आणि पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1960 चे नियम 3 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करीत आहेत.