अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे दहा वर्षांपूर्वी झालेल्या सुरभी ज्वेलर्स दरोडा प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून दहा आरोपींना अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयाने चार ते पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ सुनीता सुशीला रमेशचंद्र तिवारी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
२६ ऑगस्ट २०१५ रोजी मनोज कांतिलाल जैन यांच्या मालकीच्या सुरभी ज्वेलर्स दुकानात याकुब चिकना गँगशी संबंधित जिनाह उर्फ जे. के. नैनामोहम्मद (रा. तुतुकुडी, तामिळनाडू) आणि त्याच्या साथीदारांनी भीषण दरोडा टाकला. आरोपींमध्ये इमदाद मुजावर (रा. श्रीगाव, अलिबाग), मोहम्मद अकबर कासीम, करण रामआशिष विश्वकर्मा (रा. मुंबई), मुबीन सगीर शेख (रा. कुर्ला), बिलाल कुरेशी (रा. कुर्ला), प्रदीप पाटील (रा. श्रीगाव), समीप पाटील (रा. पोयनाड) आणि सनी पाटील (रा. पोयनाड) यांचा समावेश होता. आरोपींनी चॉपर व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कर्मचारी जखमी केला आणि सोन्या–चांदीचे दागिने, ट्रे व रोख रक्कम असा ८९ लाख ३१ हजार रुपयांचा माल चोरून नेला. चोरीतील काही दागिने व्यापारी बिपीन बाफना (मूळ रा. पाली, राजस्थान — सध्या मुंबई) याला विकले होते.
या गुन्ह्यात भादंवि ३९५, ३९७, ४१२ सह आर्म्स अॅक्ट व मोंका लागू करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी पहिल्या टप्प्यात ८५.५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, तर दुसऱ्या टप्प्यात ६४० ग्रॅम सोनं, सॅंट्रो कार, महिंद्रा झायलो, गावठी रिव्हॉल्वर व तीन जिवंत काडतुसे जप्त केली.
न्यायालयाने जिनाह व करण विश्वकर्मा यांना ४ वर्षे, इमदाद, अकबर कासीम, मुबीन आणि बिलाल यांना ५ वर्षे तर प्रदीप, समीप, सनी आणि व्यापारी बिपीन बाफना यांना ४ वर्षांची शिक्षा आणि सर्वांना ५,००० रुपये दंड ठोठावला.
या संपूर्ण तपासात पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण विभागीय डीवायएसपी जालिंदर नारकुळे, पोयनाडचे एपीआय विजयकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. सरकारी अभियोक्ता संतोष पवार यांनी आरोपींची दोषसिद्धता निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दहा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागल्याने व्यापारी व नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.