जिल्हा रुग्णालयात संविधानाच्या सन्मानाला धक्का; कचऱ्याजवळ आढळले प्रास्ताविकाचे फलक, नागरिकांमध्ये संताप

Alibag civil hospital board
अलिबाग | अमुलकुमार जैन
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात संविधानाच्या सन्मानाला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदन कक्षाजवळील पाण्याच्या टाकीच्या परिसरात एका पत्र्याच्या शेडखाली संविधानाच्या प्रास्ताविकाचे फलक थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे फलक नेमके कोणी ठेवले, याबाबत सुरुवातीला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली होती.
स्थानिक रहिवाशांच्या मते, हे फलक काही दिवसांपासून तिथे पडून होते. मात्र, रुग्णालय प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांनी याकडे वेळेत लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “संविधान हा देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे. त्याचे असे कचऱ्याजवळ पडणे अत्यंत निंदनीय आहे,” असे एका नागरिकाने म्हटले.
या प्रकरणावर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी सांगितले, “चार ते पाच दिवसांपूर्वी एका बेवारस मृतदेहासाठी अलिबाग नगरपालिकेची ट्रॅक्टरद्वारे गाडी रुग्णालयात आली होती. त्या वाहनामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकाचे फलक ठेवलेले होते. वाहनातील साहित्य उतरवताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते फलक शवविच्छेदन कक्षाजवळील शेडखाली तात्पुरत्या स्वरूपात ठेवले. कदाचित ते पुन्हा उचलणे त्यांच्या लक्षात राहिले नसावे. रुग्णालय प्रशासनाकडून हे फलक ठेवण्यात आलेले नाहीत. आज सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते फलक काढून नेले, हे आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सांगितले की, “या घटनेबाबत सध्या माझ्याकडे सविस्तर माहिती नाही. मात्र, संबंधित विभागाकडून माहिती घेऊन आम्ही वस्तुस्थिती स्पष्ट करू.”
तज्ज्ञांचे मत आहे की, सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरात स्वच्छता, शिस्त आणि राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखणे अत्यावश्यक आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती व समन्वय आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
या प्रकारामुळे रुग्णालयाची प्रतिमा धोक्यात आली असून, संविधानाचा सन्मान राखणे ही प्रशासन व नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *