जावयाने मारला चक्क सासऱ्याच्या घरावर डल्ला; 16 तोळे सोने हस्तगत, उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू

जावयाने मारला चक्क सासऱ्याच्या घरावर डल्ला, 16 तोळे सोने हस्तगत, उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू
भाकरवड (जीवन पाटील) : 
अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गंभीर प्रकरणाचा उलगडा झाला असून, या गुन्ह्यात फिर्यादी प्रमोद मारुती ठाकूर (रा. गणेश नगर, हाशिवरे, ता. अलिबाग) यांच्या तक्रारीनुसार 19 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सोन्याचे मंगळसूत्र, हार, साखळ्या आणि अंगठ्या असे एकूण 18 तोळे वजनाचे दागिने चोरीला गेले होते.
तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. तपासाअंती, फिर्यादी यांचे जावई देवेश कृष्णा पाटील (वय 40, रा. भुते, पो. थळ, ता. अलिबाग) याचाच चोरीत सहभाग असल्याचे उघड झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कर्जबाजारीपणामुळे चोरी केल्याची कबुली दिली.
05 मार्च 2025 रोजी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 09 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीस गेलेल्या 18 तोळ्यांपैकी 16 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून उर्वरित 2 तोळे दागिन्यांचा शोध सुरू आहे.
पोयनाड पोलिसांनी वेगवान तपास करून गुन्ह्याचा छडा लावत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केल्याने स्थानिकांमध्ये पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *