5 जूनचा दिवस जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा होत असताना पोलादपूर तालुक्यात मात्र प्रदूषण दिन ठरला आहे. शिवराजधानी रायगडावर राज्याभिषेक दिनाच्या नियोजनबध्द वर्धापनदिनासाठी पोलादपूर तालुक्यातील प्रशासन तत्परतेने रवाना झाले असताना प्रदूषणकारी असामाजिक तत्वांनी पोलादपूर तालुक्यात कापडे बुद्रुक व वाकण खांबेश्वरवाडी दरम्यान रसायनयुक्त सांडपाणी आणि आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाटयाजवळ संरक्षक कठडयालगत सुमारे हजारभर रासायनिक घनकचऱ्याची पोती उघडयावरच टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
चार वर्षांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटालगत रासायनिक सांडपाणी टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना आता प्रदूषणकारी असमाजिक तत्वांनी आता पोलादपूर तालुक्यातील वाकण खांबेश्वरवाडीतील नदीपात्रालगत मोठया प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडल्याचे जागतिक पर्यावरण दिनी उघडकीस आले. यावेळी वाकण ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच जंगम यांनी दूषित पाण्याचे नमूने तपासण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडीकडे सोपविण्यात आले असून या पाण्याच्या नमून्यांचा पिण्यायोग्य आहे अथवा कसे याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.
पोलादपूर तालुक्यातील विविध नळपाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल नदीपात्रालगत असून काही विंधन विहिरींच्या पाण्यासही रासायनिक सांडपाण्याचा रंग आणि गंध तसेच चव येत असल्याने हे दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर वाई सुरूर रस्त्यावरील आंबेनळी घाटाच्या कुंभळवणे फाटयाजवळ संरक्षक कठडयालगत दरीच्या बाजूला सुमारे हजारभर रासायनिक घनकचऱ्याची पोती उघडयावरच टाकण्यात आली असून यामध्ये रिऍक्टरमधील ऍश म्हणजेच राख असण्याची शक्यता आहे. पावसाळयात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये वायू आणि जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी पोलादपूर तालुक्याचा निसर्गरम्य आणि रासायनिक बाधा नसलेल्या स्वच्छ नदीपात्रांना लक्ष्य बनविले असून चार वर्षांपूर्वी हे प्रदूषणकर्ते कशेडी घाटामध्ये दरीतील उतारावर रासायनिक टँकर्स रिकामे करून पळ काढताना ढाब्यांवर पोलीस संरक्षणात सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे उघडकीस आले होते.
पोलादपूरच्या निसर्गरम्य वातावरणाला रसायनांची बाधा आणण्याचे काम ज्या समाजकंटकांनी केले आहे; त्यांनी जागतिक पर्यावरणदिनाचा मुहूर्त साधूनच प्रदूषण करायला सुरूवात केली आहे. शिवराजधानी रायगडावर राज्याभिषेक दिनाच्या नियोजनबध्द वर्धापनदिनासाठी पोलादपूर तालुक्यातील पोलीस, महसूल, आरोग्य व पंचायत समितीतील प्रशासन तत्परतेने रवाना झाले असताना पर्यावरण दिनाला प्रदूषण दिनामध्ये बदलणाऱ्या या केमिकल वेस्ट डिस्ट्रॉयर्सना शोधून कडक कारवाई करण्याचे आता पोलादपूर पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले असून प्रशासनानेही नागरिकांच्या जिविताशी खेळणाऱ्या या प्रदूषणकारी समाजकंटकांविरूध्द कडक कारवाईचे हत्यार उपसण्याची गरज स्पष्ट झाली आहे.