चौक येथील ब्रिटीशकालीन दगडी शाळा झाली १६९ वर्षांची

Chauk school
खालापूर :
खालापूर तालुक्यातील ऐतिहासिक चौक (दगडी) शाळेला १६९ वर्ष पूर्ण झाल्याने ९ सप्टेंबर रोजी शाळेचा वर्धापन दिन विशेष कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेची ही शाळा १८५६ साली स्थापन झाली असून प्रत्येक वर्षी ८ सप्टेंबरला स्थापना दिन साजरा करण्याची परंपरा आहे.
या वर्षीचा वर्धापन दिन ९ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील मान्यवर, माजी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली तर पाहुण्यांच्या हस्ते फुलपाखरे उडवून ‘१६९’ हा आकडा खुला करून अनोखे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या उपक्रमांचे PPT द्वारे सादरीकरण करण्यात आले.
शाळेचे मासिक ‘प्रतिबिंब’ च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन डॉ. सचिन सोनावणे यांच्या हस्ते झाले. माजी विद्यार्थी मंगेश जाधव यांच्या सहकार्याने तयार झालेल्या शाळेच्या वेबसाईटचे (  ➡️ https://zpschoolchowk.in/ )उद्घाटन विद्यमान उपसरपंच पूजा हातमोडे व माजी उपसरपंच सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ९३ वर्षीय माजी विद्यार्थी रामभाऊ कोसे, सरपंच रितू ठोंबरे, उपसरपंच पूजा हातमोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी अरुण घोडके, सुदेश महागावकर, रंजना साखरे, विजय ठाकरे, नरेंद्र शहा, प्रफुल्ल विचारे, आचार्य सर, विराज शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. या वर्धापन दिनाने शाळेच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला.
 ➡️ https://zpschoolchowk.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *