राजकीय कारकिर्दीत अनेक सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य व आमदार पाहिले. मात्र, जनतेचा विकास साध्य झाला नाही तर पदाचा कालावधी वाया जातो. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानामुळे ग्रामपंचायतीच्या विकासासोबतच मोठया रकमेची पारितोषिके मिळविण्याची संधी प्राप्त झाली असून ग्रामपंचायतींनी या संधीचा लाभ घेऊन गावासाठी लोकसहभागातून मोठमोठया रकमेच्या बक्षिसांमधून विकासकामे करण्याची संधी साधावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आमदारप्रतिनिधी चंद्रकांत कळंबे यांनी केले.
पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेला सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यशाळेप्रसंगी चंद्रकांत कळंबे बोलत होते. याप्रसंगी माजी राजिप सदस्या सुमन कुंभार, गटविकास अधिकारी दिप्ती गाट, गटशिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना गोविंद फड, उपगट विकास अधिकारी हंबीर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचा हेतू विषद केला. माजी राजिप सदस्या सुमन कुंभार यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. लोहारे सरपंच दीपक मनोहर पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी, बक्षिसे मॅनेज करण्यापेक्षा ती लोकसहभागातून मिळविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करताना पोलादपूर तालुक्याला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची आठवण यावेळी करून देताना गावातील घंटा वाजविल्यानंतर ग्रामस्थ एकोप्याने देवळात जमत असत असा लोकसहभाग अपेक्षित असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी कार्यशाळेच्या स्लाईडशो वेळी उपगटविकास अधिकारी हंबीर यांनी कार्यशाळेच्या स्वरुपाचे मार्गदर्शन केले. सुशासनयुक्त पंचायत, स्वच्छ व हरित गांव, नरेगा, ग्रामस्तरावर संस्था सक्षमीकरण, उपजिविका व सामाजिक न्याय, लोकसहभागातून, नाविन्यपूर्ण उपक्रम 5 लाखापासून 50कोटींपर्यंत पारितोषिक प्राप्त करणे या अभियानात द्वारे शक्य आहे. तालुकास्तरीय पाच पुरस्कार मिळवता येणार आहेत.
जिल्हा स्तरावर 25 लाख ते 50 लाख, विभाग स्तरावर 2 कोटी ते 60 लाख अशी बक्षिसे आहेत. अभियानाच्या विविध निकषांचे लोकसंख्यानिहाय ग्रामपंचायत वर्गीकरण करण्यात आले असून अभियानांतर्गत लोकाभिमुख पंचायत, नागरी सेवा सुविधा केंद्र चर्चा, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, सीसीटीव्ही बसविणे, लेखापरीक्षण करणे, ग्रामसभा गणपूर्ती नोंदवही अद्यावत, ग्रामविकास समित्या स्थापन करणे, विविध निर्णय डाऊनलोड करणे, आयुष्मान भारत कार्ड व लाभार्थी, अनिवार्य बाबींवरील तरतूद आणि खर्च, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, कर व पाणीपट्टी वसुली, क्यूआर कोड वापर, लोकवर्गणी, स्वउत्पन्न जलसमृध्द, स्वच्छ व हरित गांव अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढविणे, अपारंपारिक ऊर्जा व सौर उर्जा वापर, वृक्षलागवड व संवर्धन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची 2 ऑॅक्टोबरपासून प्रभावीपणे अंमलबजावणी, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मनरेगा, नवीन विहीर, जलपुनर्भरण योजना, जनावरांचा गोठा, जलकुंड, घरकुल, ग्रामपंचायत सक्षमीकरण बैठक व्यवस्था कार्यालय वगैरे, शाळा डिजिटल व सुस्थिती, अंगणवाडी सुविधा, पशुवैद्यकीय उपचार केंद्र, स्मशानभूमीची शेड, दफनभूमी व रस्ता बैठक सुविधा, खुली व्यायामशाळा सुरू करणे, धार्मिक स्थळ व पर्यटन सुशोभीकरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय मध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 व 2, महिला बचत गट सहभाग उमेद अंतर्गत पात्र गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतकरी उत्पादक संघ, सामाजिक अर्थसहाय्य वंचित घटक पात्र लाभार्थी, अग्रीस्टक नोंदणी, जातीचे दाखले, लोकसहभाग व श्रमदानातील कामे, पाणंद रस्ते दुरुस्ती आदी निकषांचे स्पष्टीकरण उपगटविकास अधिकारी हंबीर यांनी केले.
धारवली सरपंच विलास सकपाळ यांनी, बक्षिसं म्हणजे मधाचे बोट आहे. मात्र काम करत ग्रामपंचायत विकास साधणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामविकास अधिकारी कमी असल्याने सरपंच व गावाला योगदान मिळत नाही. जलजीवन मिशनची कामे निकृष्ट व अपूर्ण आहेत ती पूर्ण न झाल्यास अभियानात सहभाग निरुपयोगी ठरणार आहे, असे परखड मत मांडले तर कोतवाल बुद्रुकच्या सरपंच रेखा दळवी यांनी, आपण थेट सरपंच म्हणून घाटकोपर मुंबई येथून कोतवाल येथे सरपंच म्हणून आ.प्रवीण दरेकर यांनी नाव सुचविले आणि निवड झाली. योजनांचा अभियान आणि स्पर्धा यातून गावाला लोकसहभागातून सक्रीय करण्याची संधी मिळाली आहे.ग्रामसभेच्या गणपूर्तीची समस्या महिला बचतगटाच्या सदस्यांची मिटींग लावल्याने कायमची दूर झाल्याचे यावेळी सांगितले. संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर गुरूजींनी केले.