खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर थरार! पुराच्या पाण्यात अडकलेल्या 70 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका

रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ वॉटरफॉल परिसरात सोमवारी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. धबधब्याच्या प्रवाहातून वाहणाऱ्या ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे तब्बल 70 हून अधिक पर्यटक दुसऱ्या बाजूला अडकून पडले. जवळपास दोन तास सुरू असलेल्या थरारक बचाव मोहिमेनंतर पोलीस, अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नांतून सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
दुपारच्या सुमारास मोठ्या संख्येने पर्यटक झेनिथ धबधब्यावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम काही मिनिटांतच धबधबा परिसरात दिसून आला. ओढ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि प्रवाह इतका वेगवान झाला की पर्यटकांचा परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. काही क्षणांपूर्वी आनंदाने सेल्फी काढणारे पर्यटक अचानक जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागले.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशनचे बचाव पथक आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने सुरुवातीला बचावकार्य करणे अत्यंत धोकादायक ठरत होते. त्यातच डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. बचाव पथकाने घाई न करता परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर मोठा मजबूत दोर ओढ्यावर बांधून एकामागोमाग एक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे अभियान सुरू करण्यात आले. बचाव मोहिमेदरम्यान लहान मुलांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. अडकलेल्या पर्यटकांमध्ये दीड वर्षांच्या बालकापासून ते 60 ते 65 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. अखेर सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
या धाडसी बचाव मोहिमेमुळे मोठी दुर्घटना टळली. हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहापूर येथे दोन पर्यटक वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच खोपोलीतील हा प्रसंग घडल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना इशारा दिला आहे. पावसाळ्यात धबधबे, नदीकाठ, ओढे आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे तसेच हवामानाचा अंदाज आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात धबधब्यांवर अचानक पाण्याची पातळी वाढणे ही सामान्य बाब आहे. त्यामुळे सेल्फी किंवा पाण्यात उतरण्याचा मोह टाळून सुरक्षित अंतर राखणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणेच सर्वात सुरक्षित ठरते.