महाडमधील देशमुख कांबळे गावात ढगफुटीसदृश्य पाऊस; काही मिनिटांत गाव जलमय, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महाडमधील देशमुख कांबळे गावात ढगफुटीसदृश्य पाऊस
रायगड | अमुलकुमार जैन
कोकणात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. मंगळवारी दुपारनंतर देशमुख कांबळे गावात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवरून पाण्याचे प्रचंड लोट वाहू लागले आणि संपूर्ण गावाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी पावसाचे पाणी घरांच्या परिसरात शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये रस्त्यांवरून वेगाने वाहणारे पाणी आणि गावातील गंभीर परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी मातीचे धूप होण्यास सुरुवात झाली असून शेतीचेही प्राथमिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, हवामान विभागाने कोकणात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.