
कर्जत ग्रामीण | मोतीराम पादीर
रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोस्ट कर्जत यांनी अवैध गुटखा व पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करत सुमारे ₹2,00,715 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी, 21 मार्च 2026 रोजी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे हे सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत ड्युटीवर होते. यावेळी ट्रेन क्रमांक 22944 डाउन इंदौर–दौंड एक्सप्रेस सकाळी 7:12 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दाखल झाली. नियमित तपासणीदरम्यान S-2 डब्यातून दोन व्यक्ती 4 ते 5 मोठ्या बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना दिसले. संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली; मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
यानंतर दोघांना आरपीएफ पोस्ट कर्जत येथे आणण्यात आले. उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष बॅगांची तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय 23, रा. कामोठे, पनवेल) व अंकुश कुमार हरी कुमार (वय 21, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली.
तपासणीदरम्यान त्यांच्या पाच बॅगांमध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यात विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, V-1 तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण ₹2,00,715 किमतीचा माल जप्त करण्यात आला.
सदर मुद्देमाल पंचनामा करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला. तसेच आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे फूड इन्स्पेक्टर प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त माल जीआरपी कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी जीआरपी कर्जत यांनी CR No. 31/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 275, 223, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईत आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Related