कर्जत तालुक्यातील पाथरज, खांडस व अंभेरपाडा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये युनायटेड वे मुंबई संस्थेच्या कार्यान्वयित आणि क्रिसिल फाउंडेशनच्या अर्थसहाय्याने राबविण्यात आलेल्या जलसंजीवनी प्रकल्पाअंतर्गत एकूण चार जलसंरचना (तीन स्टॉप डॅम व एक कोरवाल) उभारण्यात आल्या आहेत. या जलसंरचनांमुळे सुमारे ८१ एकर क्षेत्र लागवडीखाली येणार असून, त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकता जल उपयोगिता समूह स्थापन करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा जलसंरचना हस्तांतरण कार्यक्रम पाथरज ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरपाडा गावात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात पाथरज ग्रामपंचायत प्रतिनिधी नामदेव वारघडे यांच्याकडे जलसंरचना हस्तांतरण पत्रक सुपूर्द करण्यात आले. बंधारे उभारणीसाठी आपल्या जमिनीची जागा देऊन सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास क्रिसिल फाउंडेशनच्या प्रतिनिधी सौ. ज्योती व मनी कंदन, युनायटेड वे मुंबई संस्थेचे क्लायमेट चेंज विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अजय गोवले, पत्रकार मोतीराम पादीर तसेच शिक्षक, बचत गटाच्या महिला, शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या लेझीम सादरीकरणाने झाली. युनायटेड वे मुंबईच्या जलसंजीवनी प्रकल्पाचे मंगेश बोपचे यांनी प्रस्तावना मांडली, तर विद्यार्थिनींनी समूहगीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. अजय गोवले यांनी कर्जत परिसरात राबविण्यात येणाऱ्या जलसंजीवनीसह पोषण, अंकुर, सक्षम आदी विविध प्रकल्पांची माहिती देत ‘पर्यटकांचे कर्जत’ आणि ‘वास्तविक कर्जत’ यातील सामाजिक-आर्थिक तफावत अधोरेखित केली. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले, तर क्रिसिल फाउंडेशनच्या सौ. ज्योती यांनी प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत युनायटेड वे मुंबई संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन विवेक कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जल संजीवनी टीमने विशेष परिश्रम घेतले.