उसने पैशांच्या वादातून वृद्धाचा खून; आरोपी संदीप गुप्ताला जन्मठेप – उल्वेतील थरारक प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा सनसनाटी निकाल

पनवेल | अमुलकुमार जैन
उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून एका वृद्धाचा निर्घृण खून करून त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करत घरातील दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आरोपी संदीप गुप्ता याला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. उगले साहेब यांनी ७ मे २०२६ रोजी दिलेल्या या निकालामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
न्यायालयाने आरोपी संदीप गुप्ता, रा. उल्वे याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७, ३९४ आणि ३९७ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप, प्रत्येकी सात वर्षांचा दोन वेळा सश्रम कारावास तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या प्रकरणातील मयत रामप्रसाद गुप्ता आणि त्यांची पत्नी लक्ष्मीदेवी हे उल्वे येथील फ्लॅटमध्ये एकटे राहत होते. त्यांची मुले आणि मुलगी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होती. आरोपी संदीप गुप्ता हा रामप्रसाद यांच्या मुलगा सतीश याचा मेव्हणा होता. त्याने रामप्रसाद यांच्याकडून ७० हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत मागितल्याच्या रागातून आरोपीने चोरी आणि खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले.
दि. २२ एप्रिल २०२४ रोजी आरोपी संदीप हा रामप्रसाद यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात रामप्रसाद आणि त्यांची पत्नी दोघेच होते. लक्ष्मीदेवी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असताना आरोपीने रामप्रसाद यांना बेडरूममध्ये नेऊन चाकूने वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर संशय आल्याने बेडरूममध्ये आलेल्या लक्ष्मीदेवींवरही गळ्यावर वार करून त्यांना बाथरूममध्ये आपटले.
यानंतर आरोपीने घरातील कपाटातून सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड चोरून घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मीदेवी कशाबशा इमारतीखाली आल्या. तेथे त्यांनी एका साक्षीदारासमोर इंग्रजी वर्तमानपत्रावर “सतीश के साले ने मेरे पति को मारा” असे लिहून ठेवले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
या खटल्यात लक्ष्मीदेवी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक स्मिता जाधव यांनी केला. पनवेल सत्र न्यायालयात सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तब्बल दोन वर्ष चाललेल्या सुनावणीत १६ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली. तसेच जप्त केलेले दागिने आणि ८० हजार रुपयांची रक्कम फिर्यादी लक्ष्मीदेवी यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या तपासात पोलीस वाघचौरे, पोलीस गिरासे, तत्कालीन डीवायएसपी स्मिता जाधव तसेच साक्षीदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. वृद्ध आणि एकाकी नागरिकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत खून आणि चोरी करणाऱ्या प्रवृत्तीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.