मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा व ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारप्राप्त अशोक सराफ यांचा हजारो चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील ‘भूमिपुत्र भवन’ येथे रविवारी सपत्निक भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.
या वेळी नरेंद्र बेडेकर निर्मित ‘बहुरूपी अशोक’ या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
समारंभाला माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री व आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
अशोक सराफ म्हणाले, “आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्य उजळून गेले. रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले. महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी माझे अनेक सत्कार झालेत, पण उलव्यातील नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही. महेंद्रशेठ घरत यांच्याबद्दल माझ्यामनात आदर वाढला.”
या वेळी सुनील तटकरे यांनी अशोक सराफ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. रामशेठ ठाकूर यांनी महेंद्रशेठ घरत यांच्याबद्दल बंधुत्व व्यक्त केले. सुशीलकुमार शिंदे यांनी रायगडमधील दि. बा. पाटील यांच्या योगदानाचा गौरव केला. वनमंत्री गणेश नाईक यांनी अशोक सराफ यांच्या योगदानाची दखल घेतली व निवेदिता सराफ यांच्या साथीतले कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
या वेळी महेंद्रशेठ घरत यांनी ‘भूमिपुत्र भवन’ उभारणीत आपला सिंहाचा वाटा असल्याचे सांगून उरणचे हुतात्मा स्मारक उभारण्याची मागणी केली.
—————————————
“कलेवर मी प्रेम करतो. नाटक, चित्रपट, क्रिकेट यांची मलाही आवड आहे. कला जिवंत राहावी, तिला चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला उलवे नगरीत आणले. रसिकांच्या तुडुंब गर्दीत आज त्यांना ‘याचि देही याचि डोळा’ सर्वांनी पाहिल्याने मलाही मनस्वी आनंद झाला. त्यांना मानाचा मुजरा करतो.”