अवकाळी पावसानं ॠतूचक्रातील विक्रम मोडीत काढून जनजीवन केलं विस्कळीत

River mangav
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : 
ऋतुचक्राला चक्रावणारा अवकाळी पावसाळा आणि मे महिन्यात मान्सूनच्या आगमनाचे परिणाम आणि विपरित पडसाद उमटले आहेत. अवकाळी पावसाने ॠतूचक्रातील सारे विक्रम मोडीत काढून संतत व मुसळधार पडणाऱ्या या पावसाने सारे जनजीवन पूरते विस्कळीत केले असल्याने एकंदरीत पूर सदृष्य दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बळीराजा शेतकरी आता पावसाळी शेतीच्या कामाला लागतो न लागतो तोच पावसाने चिखल केला आहे. बियाणं पेरणी करुन ते आता जोमदार रुजणार तरी कसे? असा प्रश्नचिन्ह बळीराजाला सतावत आहे. त्यामुळे शेतीच यावर्षी नमनालाच मोठ नुकसान सुरु झाल आहे. आता शासन व्यवस्था पंचनामे तरी कसले आणि कुणा कुणाचे करणार?
एकंदरीत सर्वच तालुक्यात नव्हे तर जिल्हा राज्यातील जनजीवनावर अनपेक्षितपणे ऐन लग्नसराई, परीक्षांचा कालावधी संपून मे महिन्याची सुट्टी सुरु असतानाच, तसेच तालुक्यातील भात कापणीची कामे बाकी असताना खेडो पाड्यातील आगोटच्या या महिन्यात पावसाळापूर्व घरातील अन्नधान्य, कडधान्य डाळी, मसाले, पापड, लोणची वाळवणी साठवणीचा कार्यक्रम लगबग सुरु असतानाच तो आला आहे.
वादळ वाऱ्यासह तो बरसतोय, सारे आक्रीत चक्रावणारे आहे. खेड्यापाड्यातील घरांची कौल चाळणे, एक ना अनेक कामांच्या लगबगीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात त्याने अनपेक्षितपणे जोरदार मुसंडी मारली अन जुन जुलैच्या पावसाळ्याचे सारे विक्रम मोडीत काढीत नुसतीच पुर सदृष्य परिस्थिती नाही तर सर्वत्र दाणादाण उडवली आहे. पावसाळा पूर्व नालेसफाईचे वास्तव उघडे पाडले, वाहत्या पाण्याच्या प्रवाही जागोजागी प्लास्टिकजन्य कचरा दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर पाणी तुंबले, काही ठिकाणी तर चक्क रस्तेच वाहून गेले आहेत. कोकण रेल्वे रुळावर दगड कोसळून वेळापत्रक बिघडले. तसे कोकणातील घाट रस्त्यांवर चिखल माती वाहून आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला लांबच लांब रांगा लागल्या. सुट्टीच्या हंगामात प्रवास करणे आता आणखीन धोकादायक झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडवर पाणी तुंबले, आधीच वाहतुक कोंडी अर्धवट महामार्ग समस्या आणखीनच चिघळली, कोकणातील पाऊस तसा येथील जनतेला नविन नाही पण तो अशाप्रकारे अनपेक्षित अचानक सुरु झाल्याने तारांबळ झाली आहे. महामार्गाच्या कामाची येथील व्यवस्थेला आधीच मोठी हाऊस, आता त्यात पडला असा हा अवकाळी पाऊस! त्यामुळे अनेक वल्गना आणि आश्वासन पार धुळीत मिसळत चिखलात गेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *