अलिबाग ते रेवदंडा हमरस्त्यावर रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हे कुत्रे अचानक रस्त्यावर धावत पाठलाग करतात, काही वेळा समोर येऊन अपघातास कारणीभूत ठरतात. या प्रकारामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. विशेषतः सुनसान भागात व ग्रामीण हद्दीत ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. कुत्र्यांचे थवे एकत्र येऊन वाहनांच्या मागे लागतात, त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना गती कमी करावी लागते आणि अपघाताचा धोका वाढतो.
गावकरी व प्रवासी नागरिकांनी या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्र गस्त, निर्बिजीकरण मोहीम आणि रस्त्यांवरील प्रकाशयोजना यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.