अलिबाग शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) धक्का देत गोविंद बंदर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहरप्रमुख ॲड. संदीप पालकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या पक्षप्रवेशामुळे अलिबाग शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गोविंद बंदर येथील शेकापचे कार्यकर्ते इस्माईल मोईडन अब्दुल्लाह सय्यद, सलाहुद्दीन गायसुद्दीन शाह आणि कामरुद्दीन गायसुद्दीन शाह यांनी शिवसेनेत प्रवेश करत पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि शहरातील जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, जिल्हा सहसंघटक अजित पाटील, विधानसभा प्रवक्ते धनंजय गुरव, अलिबाग समन्वयक हेमंत पाटील, अकबर मुजावर, शहर संपर्कप्रमुख मंगेश म्हात्रे, उपशहरप्रमुख वसंत जैन, मिलिंद खानोलकर, वैभव नाईक, जितेंद्र जैन, नितीन रहाटे, शाखा संपर्कप्रमुख सीताराम काजवे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी ॲड. संदीप पालकर यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, अलिबाग शहरातील विकास, नागरिकांच्या समस्या आणि जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना अधिक ताकदीने लढा देणार असल्याचे सांगितले. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गोविंद बंदर परिसरात शेकापचा प्रभाव मानला जात असताना तेथील कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अलिबागमधील राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.