महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी, असा संतप्त सवाल पनवेल-अलिबाग विनाथांबा बसमधील एका प्रकारामुळे उपस्थित झाला आहे. महिला अधिकाऱ्याला उतरवण्यासाठी विनाथांबा बस थांबवली जाते; मात्र अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नातेवाइकांना काही अंतरावर उतरवण्यासाठी केलेली विनंती धुडकावली जाते. त्यातच चालकाकडून प्रवाशांना उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप होत असल्याने एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल एसटी आगारातून दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पनवेल-अलिबाग विनाथांबा बस अलिबागच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अलिबाग तालुक्यातील चिंचोटी परिसरात झालेल्या निधनानंतर अंत्यविधीसाठी काही नातेवाईक प्रवास करत होते. दुःखाच्या प्रसंगी वेळेत पोहोचण्याची घाई असताना या प्रवाशांना एसटीच्या भूमिकेमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याचे सांगण्यात येते.
अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील सुरुची हॉटेलजवळ एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या वर्तक नामक महिला अधिकाऱ्याला उतरवण्यासाठी बस थांबवण्यात आली. मात्र, अलिबाग आगारापासून काही अंतरावर असलेल्या थांब्यावर अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नातेवाइकांना उतरवण्याची विनंती करण्यात आली असता चालकाने बस थांबवण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
यावेळी चालकाने प्रवाशांना उद्देशून, ‘तुमच्या बापाची एसटी आहे का? आमची मर्जी असेल तिथे थांबवू. आमच्या कर्मचाऱ्यांना घेण्याचा अधिकार आहे,’ अशा शब्दांत उत्तर दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या वक्तव्यामुळे प्रवाशांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली असून एसटी कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना अशी वागणूक मिळणार असेल तर महामंडळाच्या प्रवासी सेवेला अर्थ काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
विनाथांबा बसला अधिकृत थांब्याव्यतिरिक्त कुठेही थांबण्याची परवानगी आहे का, कर्मचाऱ्यांना प्रवासात उतरवण्यासाठी विशेष सवलत किंवा नियम आहेत का आणि असे नियम असतील तर सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा लाभ का मिळत नाही, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत. नियम सर्वांसाठी समान असावेत, ही अपेक्षा असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगळी वागणूक आणि सामान्य प्रवाशांसाठी वेगळा निकष का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
एसटी महामंडळ ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रवाशांना सन्मानाची वागणूक देणे ही चालक आणि वाहकांची जबाबदारी आहे. संबंधित घटनेची पनवेल आगार प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन बसमधील घटनेची चौकशी करावी, चालकाच्या वर्तनाची तपासणी करावी आणि प्रवाशांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
एसटी प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन संबंधित चालकावर कारवाई करणार का, की अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि सामान्य प्रवाशांसाठी वेगळे नियम असेच सुरू राहणार, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.