RBI चा मोठा दणका! देशातील 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; कर्ज घेण्यापूर्वी तपासा यादी

मुंबई | विशेष प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील वित्तीय क्षेत्रात मोठी कारवाई करत एकूण 63 फायनान्स कंपन्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 49 नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे (NBFC) परवाने रद्द करण्यात आले असून, अन्य 14 कंपन्यांनी स्वतःहून आपली नोंदणी परत केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.
RBI च्या माहितीनुसार, नियामक नियमांचे पालन न करणे, निर्धारित अटी पूर्ण न करणे तसेच व्यवसाय बंद करणे अशा कारणांमुळे संबंधित कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 49 कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश 1 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरदरम्यान पारित करण्यात आले होते. ही कारवाई RBI अधिनियम, 1934 मधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे.
स्वतःहून नोंदणी परत करणाऱ्या 14 कंपन्या :
एकूण 14 कंपन्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपली नोंदणी परत केली आहे. यामध्ये सहा कंपन्यांनी NBFC व्यवसाय बंद केला, पाच कंपन्यांना नोंदणीची आवश्यकता उरली नव्हती, तर उर्वरित तीन कंपन्यांच्या बाबतीत विलीनीकरण किंवा व्यवसाय बंद होण्यासारखी कारणे नमूद करण्यात आली आहेत. या कारवाईत
  1. मणिभवनाम होम फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Manibhavnam Home Finance India Pvt Ltd)
  2. सन सोर्स लीफिन प्रायव्हेट लिमिटेड (Sun Source Leafin Pvt Ltd)
  3. लियानर डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड (Lianar Distributors Pvt Ltd) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
RBI ने नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या कंपन्यांना यापुढे NBFC म्हणून व्यवसाय करता येणार नाही. स्वतःहून नोंदणी परत करणाऱ्या कंपन्यांमध्ये
  1. अमर प्लाझा अँड होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (Amar Plaza & Holdings Pvt Ltd)
  2. विकोनिक व्यापार प्रायव्हेट लिमिटेड (Viconic Vyapaar Pvt Ltd)
  3. सीजीआर मर्कंटाइल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (CGR Mercantile Finance Pvt Ltd)
  4. ब्रावो कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Bravo Capital Services Pvt Ltd)
  5. मनीष सिंथेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड (Manish Synthetics Pvt Ltd)
  6. राईट ट्रेजन फायनान्स अँड लीजिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (Right Traison Finance & Leasing India Pvt Ltd)   यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
नागरिकांनी कोणत्याही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना किंवा आर्थिक व्यवहार करताना संबंधित कंपनीची नोंदणी वैध असल्याची खात्री करावी. यासाठी RBI च्या अधिकृत वेबसाइटवर ( www.rbi.org.in ) जाऊन माहिती तपासावी आणि अनोळखी कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्सना बळी पडू नका आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सर्व आवश्यक माहिती तपासा.