उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊनही सीबीआय चौकशीची औपचारिक मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांची मी, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी भेट घेतली. दादांचा जो अपघाती मृत्यू झाला त्यासंदर्भात निवेदन देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्य सरकारकडून यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
दुर्घटना घडली त्या दिवशी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू आणि मुरलीधर मोहोळ घटनास्थळी उपस्थित होते, अशी माहिती देत तटकरे म्हणाले की, भारत सरकारने या दुर्दैवी विमान अपघाताच्या तपासासाठी आधीच एक स्वायत्त संस्था नेमली आहे आणि त्या यंत्रणेने तपास सुरू केल्याचे जाहीर केले आहे.
स्वायत्त संस्था तपास करत असली तरी सीबीआयमार्फत तपास झाल्यास तो अधिक व्यापक आणि सखोल होऊ शकतो. अशा अपघातांच्या चौकशीत बाह्य तज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा सर्वंकष तपास व्हावा, सर्व मुद्दे तपासले जावेत आणि अंतिम निष्कर्ष राज्यासह देशातील जनतेसमोर मांडावा, ही आमची भूमिका आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केंद्राशी पत्रव्यवहार होणार असल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.