रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रेवदंडा आगरकोट किल्ला (Revdanda Fort) पुरातत्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. याच ठिकाणी आलेल्या पुणे येथील महिला पर्यटक अबोली श्रीकांत देशपांडे (वय ५३) यांच्या अंगावर सातखणी बुरुजाचा भाग अचानक कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर स्थानिक व पर्यटकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
स्वातंत्र्य दिन, दहीहंडी आणि रविवार अशी तीन दिवसांची सुट्टी एकत्र आल्याने मुंबई-पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आले होते. देशपांडे दांपत्य हे नागाव येथे वास्तव्याला येऊन रेवदंडा येथील आगरकोट किल्ला व सातखणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते. मात्र फिरून झाल्यावर बॅग आणण्यासाठी गेलेल्या क्षणी बुरुजाचा सिमेंटचा भाग अचानक कोसळून अबोली देशपांडे यांच्या डोक्यावर आपटला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने अलिबाग येथे हलवण्यात आले आहे.
या अपघातामुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगरकोट किल्ला व सातखणी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत असून, पर्यटकांच्या जीवाला सतत धोका आहे. स्थानिकांचा आरोप आहे की पुरातत्व विभाग व शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करून किल्ला नकाशावरून गायब करण्याचा डाव आखत आहेत. त्यामुळे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती व पर्यटक सुरक्षाव्यवस्था सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्य सरकार व संबंधित मंत्र्यांकडे केली आहे.